अकोला– हल्लीच्या आधुनिक काळात वैद्यक शास्त्राने प्रगति केलेली असल्याने सर्वच आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. तेव्हा आजारांना न घाबरता नियमित तपासणी, लवकर निदान , लवकर उपचार व लवकर रोगमुक्ती हे सुत्र ध्यानात घ्या, अशा शब्दात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहन भागडे यांनी आज मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णांची रक्तशर्करा, ईसीजी, रक्तदाब तसेच हृदयरोग संदर्भातील काही चाचण्या मोफत करण्यात आल्या. त्यानंतर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, अधीक्षक मिरा पागोरे, गजानन महल्ले, डॉ. आश्विनी खडसे, डॉ, बिनित सिन्हा, डॉ. कुंदन गावंडे, डॉ. आकाश अडसुले, डॉ. योगेश केदार आदी उपस्थित होते.
डॉक्टर भागडे म्हणाले की, हृदय रोग हा सर्वाधिक घातक आजार असून तो अगदी अंतिम क्षण येईपर्यंत आपण दुर्लक्ष करतो. नियमित तपासण्या करीत नाही. पाश्चात्य देशांमध्ये ॲंजिओग्राफि सारख्या चाचण्या आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हृदय वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्यास ते तात्काळ निदान होऊन उपचार लगेच करणे शक्य होते. हल्ली शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यासारख्या योजनांमुळे आपला आर्थिकस्तर कोणताही असला तरी विनामुल्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्णांनी आजारांना न घाबरता लवकर निदान, लवकर उपचार आणि आजारातून सुटका या सुत्राचा अवलंब करावा, असे सांगितले. धुम्रपान, मद्यपान, धकाधकीची जीवनशैली, मानसिक ताण तणाव यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. तसेच महिन्याला 20 पेक्षा जास्त सिगारेट व 400 मिली पेक्षा जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांना हृदयविकाराची शक्यता अधिक असते,असेही डॉ. भागडे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. डॉ. आश्विनी खडसे यांनी जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व सांगितले