अकोला दि.6: महिला व बालविकास पुणे विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास व संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वयोगट 12 ते 18 वर्ष गटातील बालकांसाठी कोविड लसीकरण मोहिम मंगळवारी(दि.5) राबविण्यात आली. त्यात शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम व सुर्योदय बालगृहातील 61 बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.
काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी जिल्ह्यात चार बालगृह व एक शिशुगृह कार्यरत आहे. त्यात अनुक्रमे 130 बालके व 14 शिशु या संस्थेमध्ये निवासी राहतात. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबविण्याकरीता लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कापसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने बालगृहात लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या शिबीरात शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्योदय बालगृहातील एकूण 61 बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 12 ते 14 वयोगटातील 26 बालके व 15 ते 18 वयोगटातील 35 बालकांचा समावेश आहे. कोवीड लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, बालगृहांचे श्रीमती वाढे, प्रशांत देशमुख, वैशाली भटकर, भाग्यश्री घाटे, विजयता रायपुरे कापशी प्राथमीक आरोग्य केंद्राचे श्रीमती डॉ. वाघमारे, डॉ. डाबेराव यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी संपन्न झाले.