अकोट-: अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. चकोर बाविस्कर यांनी अकोट शहर पी रटे अप नं. १२०/१८ मधील आरोपी निलेश प्रमोद काटोले वय अंदाजे ३० वर्ष रा. गोलबाजार, अकोट, जि. अकोला या आरोपीने एम.एस.ई.बी.एम.एस.ई. डि.एस.एल विद्युत महावितरण, अकोट शहर विभाग येथील कर्मचारी व या प्रकरणातील फिर्यादी योगेश पांडुरंग दिघे हा इतर कर्मचा-यांसोबत दिनांक २०.०३.२०१८ रोजी विज बिलाची थकबाकी वसुल करण्याकरिता गेलो असता या प्रकरणातील आरोपी निलेश प्रमोद काटोले याने थकीत विज बिल वसुलीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासंबंधी रिपोर्ट दिल्यावरून या प्रकरणात अकोट सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला व या सत्र खटल्यामध्ये आरोपीविरूध्द भा.दं.वि.चे कलम ३५३ प्रमाणे फिर्यादी लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असतांना व कर्तव्य कायदेशीरपणे पार पांडित असताना लोकसेवकास प्रतिबंध करण्याच्या किंवा धाकाने परावृत्त करण्याच्या उद्देशाने जो कोणी त्याच्यावर फौजदारी पात्र बलप्रयोग करेल असा भा.द.वि.चे कलम ३५३ प्रमाणे गुन्हा केल्याचे सिद झाल्याने या आरोपीला विद्यमान न्यायालयाने ३५३ भा.दं.वि. या कलमांर्तगत शिक्षापात्र गुन्हयासाठी आरोपीस ६ महिन्यांच्या साध्या कारावासाची आणि रु.५,०००/- इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने द्रव्यदंड न भरल्यास त्याने दोन महिन्यांचा अधिकचा कारावास भोगावयाचा आहे. असा न्यायनिर्णय पारित केला आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, फिर्यादी योगेश पांडुरंग दिये रा. उज्वल नगर, दर्यापूर रोड, अकोट, व्यवसाय-नौकरी महावितरण अकोट शहर विभाग, फिर्यादी यांनी दिनांक २०.०३.२०१८ रोजी सकाळी १०.१५ मिनिटांनी फिर्यादी व त्याचे सहकारी वीज बिल वसुलीकरिता ग्राहक पि.एल.काटोले रा. गोलबाजार अकोट, ग्रा.क. ३१८७३०१००४२६ यांचेकडे थकीत असलेले रू.३७७१/- चे बिल थकीत असून भरणा करणेबाबत विचारणा केली असता आरोपी निलेश काटोले घरातून आले व फिर्यादी योगेश दिघे याला अश्लिल भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत चोमन्या तुला करंट देउन मारून टाकतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. सदरहु काम हे शासकीय स्वरूपाचे असून आरोपी निलेश काटोले यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदरची शिवीगाळ व धक्काबुक्की आरोपी निलेश काटोले यांनी फिर्यादी योगेश दिधे वरील शिवीगाळ त्यांचे सहकारी श्री घनराज हिवरे, श्री. चेतन रा. गणगणे. श्री. सुनिल सुलताने, श्री. मंगेश कावरे व श्री. रूपेश तायडे यांचा समक्ष केली आहे.
त्यावरून फिर्यादीने पो.स्टे. अकोट शहर येथे फिर्याद नोंदविली. या फिर्यादी वरून तपास करून तपास अधिकारी साहायक पोलीस उपनिरिक्षक विजय सिरसाट अकोट शहर पो.स्टे. यांनी आरोपी विरुद भादंवि चे कलम ३५३,२९४,५०४,५०६ प्रमाणे आरोपीविरूध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या सत्र खटल्यामध्ये सरकारपक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी एकूण ५ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयामध्ये नोंदविल्या. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद झाल्याने दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर वि. कोर्टाने आरोपीला उपरोक्त शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे या प्रकरणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी शिक्षेसंबंधी युक्तीवाद केला की, आरोपीविरूध्द असलेला गुन्हा गंभीर आहे. कायद्यात सुधारणापूर्वीच्या तरतुदीनुसार का होईना, आरोपीस जास्तीत जास्त पूर्ण कालावधीची म्हणजे दोन वर्षापावेतोच्या कारावासाची आणि मोठया द्रव्यदंडाची शिक्षा करावी, जेणेकरून समाजात योग्य संदेश जाईल आणि अशा प्रकारचे गुन्हे करण्यापूर्वी लोक विचार करतील. विद्यमान न्यायालयाने देखील निकाल पत्रामध्ये नमूद केले की,
अशा सिध्द गुन्हयांत आरोपीस अनाठायी दयाबुध्दी दाखवणे म्हणजे अशा समाजविघातक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासारखे होईल. यातून प्रामाणिकपणे काम करणा-या लोकसंवकांची आधीच दुर्मीळ व दुर्बळ होत चाललेली कर्तव्यनिष्ठा अधिकच हतोत्साहित होईल. शिवाय, आहे तेवढे वीज देयक नियमित भरणा-या लुप्त होत जाणा-या उरल्यासुरल्या प्रजातींची कूर थटटा केल्यासारखेही होईल. तसेच या प्रकरणाचा तत्कालीन तपास अधिकारी म्हणून साहायक पोलीस उपनिरिक्षक महेंद्र गवई यांनी तपास केला होता व आरोपीविरूध्द वरील प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर विद्यमान न्यायालयाने आरोपीला उपरोक्त ६ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा आणि रू. ५,०००/- दंडासह ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून ए.एस.आय मोहन फरकाडे यांनी सहकार्य केले.