हिवरखेड (धिरज बजाज):– नगरपंचायत साठी मागील 25 वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक संघर्षाला यश मिळणार असल्याचे चित्र असून आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत उत्तर देताना 1 महिन्याच्या आत हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक उद्घोषणा करणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे 40,000 हिवरखेड वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हिवरखेड विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथील वास्तविक लोकसंख्या चाळीस हजारच्या वर आहे येथे 18 हजार मतदार आहेत. हिवरखेडवर आजूबाजूची अनेक खेडी अवलंबून आहेत. ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधी मधून गावाचा सर्वांगीण विकास शक्यच नाही.
शासकीय निकष पाहता हिवरखेड “ब” वर्ग नगरपरिषदेचे निकष पूर्ण करते त्यामुळे विकासात माघारलेल्या गावाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी नगरपरिषद करावी नाही तर कमीत कमी नगरपंचायत तरी करावी. अशी मागणी गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे. आ. अमोलजी मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात याबाबत आवाज बुलंद केला आहे. व सातत्याने ही मागणी शासन दरबारी रेटून धरली आहे. अनेक पत्रकार बांधव, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तत्कालीन अनेक सरपंच, ग्रा प सदस्य, जागरूक नागरिक, व संबंधित सर्व जण मागील अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. 15 ऑगस्ट 2021 पासून पत्रकाराने आमरण उपोषण केले होते. त्यांच्यासोबत हजारो नागरिकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. त्यावेळी नगरविकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी व पालकमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी लवकरात लवकर नगरपंचायत करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते. दुसरीकडे महाराष्ट्र दिनापूर्वी हिवरखेड नगरपंचायतची घोषणा करावी. अन्यथा इच्छामृत्यूची परवानगी द्यावी असे पत्र एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व वरिष्ठांना दिले आहे. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना नगरपंचायत करण्याबाबत पत्र दिले. नगरपंचायतसाठी आजपर्यंत आमरण उपोषणे झाली.
अनेक आंदोलने झाली, निदर्शने झाली. बाजारपेठ बंद झाली, महाराष्ट्रात स्वतःचे सरकार असल्यावरही त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागला. नगरपंचायत होण्यासाठी आतापर्यंत अनेक ग्रामसभा, विशेष ग्रामसभा, व मासिक सभेचे अनेक सकारात्मक ठराव सहित परिपूर्ण प्रस्ताव पोहोचलेले होते. व नगरपंचायत होण्यातच होती. पण 21 ऑगस्ट रोजी एक वादग्रस्त व नकारात्मक ठराव मंत्रालयात पाठविण्यात आला होता त्यावर बराच वादंग झाला होता. नंतर पुन्हा दिनांक 7 मार्च 22 रोजीच्या ग्रामसभेत शेकडो नागरिकांच्या सर्व संमतीने “तो” वादग्रस्त व नकारात्मक ठराव रद्द करण्यात आला आणि हिवरखेड नगरपंचायत तात्काळ करण्यात यावी. असा नवीन ठराव घेण्यात आला. सदर नवीन ठरावाची प्रत नगरविकास मंत्रालयात पोहोचलेली आहे. दि. 9 मार्च रोजी आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रश्नाला विधान परिषदेत उत्तर देताना नगर विकास राज्यमंत्री यांनी एका महिन्यात हिवरखेड नगरपंचायतची प्राथमिक उद्घोषणा करणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वांच्या सामूहिक संघर्षाला यश येणार असल्याचे दिसत असून 40000 हिवरखेड वासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.