नवी दिल्ली: रशिया- युक्रेन युद्धामुळे या देशांतून युरोप आणि आफ्रिकेत होणारी गहू (wheat) आणि अन्यधान्य निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे पर्याय म्हणून भारतातील गहू खरेदीसाठी मागणी वाढली आहे. अलीकडील काही दिवसांत भारतातून सुमारे ५ लाख टन गहू निर्यातीसाठी व्यापाऱ्यांनी करार केले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गहू, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे जगात धान्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताकडे आता गहू खरेदीदार आकर्षित झाल्याचे वृत्त Reuters ने दिले आहे.
रशिया- युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारी धान्य पुरवठ्याची वाहतूक थांबली आहे. रशिया आणि युक्रेनमधून जगातील एकूण निर्यातीपैकी ३० टक्के गहू निर्यात होतो. पण युद्धामुळे या देशांतून होणारी गव्हाची निर्यात थांबली आहे. दरम्यान, भारतात सलग वर्षे गव्हाचे बंपर उत्पादन झाले आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचा साठा शिल्लक आहे. यामुळे व्यापारी आता निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत.
“जागतिक बाजारातील किमतीतील वाढीमुळे भारतीय पुरवठादारांना गव्हाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे सोपे झाले आहे,” असे एका जागतिक ट्रेडिंग फर्ममधील एका डीलरने म्हटले आहे. देशांतर्गत विक्रीसाठी उत्पादकांना सुमारे २५७ डॉलर प्रति टन दर हमी देतो, तर युरोपियन गव्हाच्या बेंचमार्क किमती (benchmark European wheat) ४०० युरो (४३५ डॉलर) च्या वर गेल्या आहेत आणि शिकागोमध्ये गव्हाच्या बेंचमार्क किमती १४ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
भारत करणार ७० लाख टन गव्हाची निर्यात
भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत आहे. “युक्रेन आणि रशियाकडून पुरवठा खंडित झाल्यामुळे खरेदीदार भारताकडे वळले आहेत. केवळ भारतच गव्हाचा मोठा, स्थिर पुरवठादार करु शकतो आणि म्हणूनच ते भारताकडे वळले आहेत,” असे एका डीलरने म्हटले आहे.
ब्रेडबास्केटवर संकट
युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश (Black Sea region) हा सुपीक आहे. हा भाग जगाचा ब्रेडबास्केट (Breadbasket of the World) म्हणून ओळखला जातो. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू (wheat) आणि बार्लीचे (barley) मोठे निर्यातदार देश आहेत. जगातील गहू आणि बार्लीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात या दोन देशांतून होते. युक्रेन मक्याचादेखील एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि सूर्यफूल तेल निर्यातीत तो जगात आघाडीवर आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकऱ्यांनी (Ukrainian farmers) देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. बंदरे ओस पडल्याने येथून जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचबरोबर कृषीसंपन्न असलेल्या रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात कमी होऊ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.