हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याच्या विद्युत बिलाचा पूर्ण भरणा करण्यात हिवरखेड ग्रामपंचायत सक्षम न ठरल्याने आतापर्यंतची एकूण थकबाकी तब्बल 52 लाख 15 हजार 190 रुपयांवर पोहोचल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून एकाच वर्षात पाच ते सहा वेळ विद्युत पुरवठा खंडित होण्याची नामुष्की हिवरखेड ग्रामपंचायतवर आली आहे.
सविस्तर असे की वारी हनुमान येथील वान धरणातून विविध शहरांसह 84 खेडी पाणी पुरवठा योजनेला पाणी दिल्या जाते. वारी येथील पाणी हिवरखेडात पोहोचल्यानंतर येथील फिल्टर प्लांट मध्ये पाण्याचे शुद्धीकरण केल्या जाते. त्यानंतर हिवरखेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. येथूनच तळेगाव आणि खंडाळा या गावांना सुद्धा पाणीपुरवठा होत असल्याचे बोलले जाते. हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याचे बिल मागील अनेक वर्षांपासून पुरेश्या प्रमाणात न भरले गेल्यामुळे आज पर्यंत सदर बिलाची रक्कम 52 लाख 15 हजार 190 रुपयांवर पोहोचली आहे ज्यामध्ये जवळपास नऊ लाख रुपये व्याजाचा सुद्धा समावेश आहे. एवढेच नव्हे तर थकबाकीची रक्कम वाढतच असल्याने दर महिन्याला जवळपास 42 हजार रुपयांच्या वर व्याज कर्जाच्या स्वरूपात चढत आहे. सदर पाणीपुरवठ्याचे कनेक्शन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्या नावाने असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एकाच वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत पाच ते सहा वेळ पाणीपुरवठा ची लाईन कट करण्याची नामुष्की हिवरखेड ग्रामपंचायत वर ओढवली आहे. दि. 25 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. 52 लक्ष रुपयांपैकी फक्त एक लाख रुपये भरण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती मिळाली. तत्पूर्वी ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे आणि कामिल अली मिरसाहेब यांनी ग्रामपंचायतला लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. वारंवार पाणीपुरवठा चा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक पूर्णतः वैतागले असून काही पाणीपट्टी न भरणाऱ्या व्यक्तीमुळे ज्येष्ठ नागरिक पाणीपट्टी भरतात त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो.
पूर्ण बिल घेता मग दररोज पाणी पुरवठा का नाही?
काही वर्षापूर्वीपर्यंत हिवरखेड येथे दररोज पाणीपुरवठा व्हायचा, नंतर एक दिवस आड पाणीपुरवठा व्हायला लागला. मागील काही काळापासून तर थेट चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही सुजान नागरिकांचे म्हणणे आहे की पूर्वी रोज होणारा पाणीपुरवठा चौथ्या दिवशी केला जात असल्यामुळे पाणीपट्टी 100% एवजी 25 ते 33% आकारल्या गेली पाहिजे. परंतु पाणीपट्टी आकारणीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकतर पाणीपट्टी कमी करावी अथवा दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुजाण नागरिक करीत आहेत.
या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी सरपंच, ग्राम विकास अधिकारी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, इत्यादी अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. बिलाचा संपूर्ण भरणा करण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरल्याने आतापर्यंत बिलाचा हा आकडा 52 लक्ष 15 हजार 190 पोहोचल्याने बिलाचे ही रक्कम आता भरणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिवरखेड ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी गटातील ग्रा.पं सदस्य सुनील इंगळे यांनी दिली.
प्रतिक्रिया,
आम्ही कारभार सांभाळला त्यावेळेस याहीपेक्षा जास्त थकबाकी होती. आमच्या काळात आम्ही व्याजासह जास्तीत जास्त रकमेचा भरणा केला परंतु कोव्हिडमुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम झाल्याने अडचणी आल्या. वसुलीसाठी जनजागृती सुरू असून आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
सौ. सिमा राऊत सरपंच हिवरखेड