अकोला,दि.26 : जिल्ह्यातील दिव्यांग, अनाथ व्यक्तींना शिधापत्रिका देऊन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी दि.८ ते १५ मार्च दरम्यान विशेष नोंदणी मोहीम राबवावी,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज मूर्तिजापूर येथे दिले.
पालकमंत्री कडू यांनी आज जिल्ह्यातील शिधापत्रिका वितरण व त्यासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.काळे, तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व पुरवठा निरीक्षक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेच्या इष्टांकानुसार पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवावयाचे आहे. त्याचा यावेळी तालुका निहाय आढावा घेण्यात आला.
पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात दि.८ ते १५ मार्च या कालावधीत अनाथ व दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवावी. यात गावनिहाय स्वस्त धान्य दुकानदारामार्फत त्यांच्या दुकानाशी जोडलेल्या कुटुंबातील दिव्यांग, अनाथ व्यक्तींची माहिती घ्यावी. अशा व्यक्तींना अंत्योदय योजनेचे कार्ड देऊन लाभ देण्यात यावा. याशिवाय अंत्योदय योजनेत अपात्र लाभार्थ्यांची नावे आलीत का? याबाबत पडताळणी करण्यात यावी. याशिवाय शिधापत्रिका विभक्त करणे, जीर्ण शिधापत्रिका बदलवून देणे, नवीन शिधापत्रिका देणे ही कामे नजीकच्या काळात विशेष शिबीर आयोजित करून नागरिकांना सेवा द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या मोहिमेत उत्तम कार्य करणाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल,असेही त्यांनी घोषित केले.