पालकमंत्री बच्चू कडू यांची संकल्पना साकार होतांना…
प्रशिक्षणातून देऊ सकळा; सफल जीवनाचे धडे
जिल्हा नियोजन समिती व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संयुक्त उपक्रमातून १८०० ग्रामीण युवक युवतींना कृषी उद्योजकता प्रशिक्षण
अकोला दि.२४ : खेड्यात तयार होणारे कृषी उत्पादन तेथेच प्रक्रिया करायचे. त्याचे मूल्यवर्धन करुन शहरात विक्रीसाठी आणायचे. त्यातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना आपल्या गावातच स्वरोजगाराची संधी निर्माण करायची, ही पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांची संकल्पना प्रत्यक्ष साकार होत आहे.
जिल्हा नियोजन समिती व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत १८०० युवक युवती तसेच शेतकरी महिला पुरुषांनी कृषी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेतले. या प्रकल्पाअंतर्गत २७०० जणांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. पुढील टप्प्यात या प्रशिक्षित व्यक्तिंना स्वतःचा व्यवसाय, उद्योग उभारणी व बाजारपेठ संलग्नतेसाठी शासनाचे विविध विभाग सहकार्य करतील.
पालकमंत्र्यांची संकल्पना
ग्रामीण भागात उत्पादीत होणारा शेतीमाल प्रक्रियेसाठी शहरात येतो तेथून प्रक्रिया करुन तो अधिक प्रक्रियेसाठी मोठ्या शहरात नेला जातो आणि परिपूर्ण उत्पादन हे विक्रीसाठी पुन्हा उलट्या मार्गाने शहरी ते ग्रामीण भागात येते. याऐवजी ग्रामीण भागातील शेतीमाल हा तेथेच प्रक्रिया करुन अंतिम उत्पादन म्हणून बाजारात आणावा, की जेणेकरुन ग्रामीण युवक युवतींना आपल्या गावातच रोजगार मिळेल, यासाठी जिल्हा प्रशासन आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे उपक्रम राबवून कृषी उद्योजकतेचे प्रशिक्षण या युवकांना द्यावे, अशी संकल्पना पालकमंत्री बच्चू कडू यांनी मांडली.
२७०० जणांना प्रशिक्षण
त्यासाठी २७०० युवक युवतींना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प विद्यापीठाचे माहिती तथा जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे यांनी तयार करीत विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाचे माध्यमातून जिल्हा नियोजन समितीला सादर केला. जिल्हा नियोजन समितीकडून २० लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. कोविडच्या लाटां दरम्यान निर्बंधांचे पालन करीत दि.२३ डिसेंबर २०२१ पासून या प्रशिक्षणांना सुरुवात झाली.
प्रशिक्षणासाठी निवड करावयाचे लाभार्थी हे कौशल्य विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, पोकरा, उन्नत भारत अभियान, पाणी फाऊंडेशन यांच्याकडे नोंदणी असलेले निवडण्यात आले. आजमितीला विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाकडे १५ हजार व्यक्तिंची माहिती जमा झाली आहे. त्यातून २७०० लोकांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात आली. आतापर्यंत १८०० जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रक्रिया उद्योगावर भर
या प्रशिक्षणार्थींना दुग्धप्रक्रिया व निर्मिती तंत्रज्ञान, व्यावसायिक शेळी पालन, व्यावसायिक कुक्कुट पालन, व्यावसायिक फळे भाजीपाला तंत्रज्ञान, भाजीपाला उत्पादन, कृषीमाल प्रक्रिया इ. प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. प्रामुख्याने बाजारपेठेची गरज ओळखून विविध उत्पादने गावातच कसे तयार करावे; याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. उदा. दुधाची प्रक्रिया करुन दही, पनीर, मावा(खवा) इ. उत्पादने हे व्यावसायिक कसोटीवर तयार करणे. फळे भाजीपाल्यापासून दीर्घकाळ टिकाऊ पदार्थ (जॅम, जेली, लोणचे इ.), भाजीपाल्याचे व्यावसायिक उत्पादन घेणे (शेडनेट, पॉलीहाऊस तंत्र वापरुन), तुर, मुग, उडीद यासारख्या कडधान्यांची डाळ तयार करणे, तेलबियांचे तेल तयार करणे, सेंद्रीय शेतीसाठी सेंद्रीय जीवाणू संवर्धक, जीवामृत, निंबोळी अर्क इ. शेळ्या मेंढ्यांचे पालन, गाई म्हशींचे पालन, त्यांचे आहार व्यवस्थापन करुन दुग्धोत्पादनात वाढ करणे, कोंबड्यांचे पालन व अंडी उत्पादन याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. यासर्व घटकांमध्ये गावातच कच्चा माल उपलब्ध असतो. त्यावर प्रक्रिया करायचे तंत्रज्ञान विद्यापीठाचे विविध विभागांकडे उपलब्ध आहे. त्याची माहिती व प्रात्यक्षिके प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत विद्यापीठाचे तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक प्रत्यक्ष देतात.
कृषीउद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी- कुलगुरु डॉ. विलास भाले
जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर पालकमंत्री ना. बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सहयोगातून अकोला जिल्ह्यातील युवा वर्गाला उद्यमशील बनविण्यासाठीच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा हा उपक्रम कृषी उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्ण संधी आहे. त्यास भरभरून प्रतिसाद द्यावा व उद्योजकतेकडे एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले आहे.
प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद- डॉ. राजेंद्र गाडे
या प्रशिक्षणांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी सांगितले. विशेषतः महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग ‘स्टार्ट अप’ साठी करावयाचा हेच उद्देश आहे. आतापर्यंतचे स्टार्टअप शहरात झाले आम्हाला ते गावात न्यायचे आहे. यामुळे मालाच्या वाहतुकीत होणारा इंधनव्यय, मनुष्यबळाचे स्थलांतर थांबविणे शक्य आहे. शिवाय प्रक्रियेनंतर जे मुल्यवर्धन होईल, त्याचा लाभ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला पर्यायाने कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. गाडे यांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे यांच्यासह प्रकल्प समन्वयक डॉ. किशोर बिडवे, सह संयोजक डॉ. प्रमोद वाकळे, डॉ. सुहास मोरे हे सर्व व्यवस्था सांभाळत आहेत. विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक आपले योगदान देत आहेत.
व्यवसाय उभारणीसाठीही मार्गदर्शन व सहाय्य
प्रशिक्षणाच्या पुढचा टप्पा हा प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी समन्वय करणे हा असून त्याद्वारे आपला व्यवसाय सुरु करु इच्छिणारे व्यक्ती वा गट यांना प्रकल्प अहवाल तयार करणे, संबंधित विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी समन्वय करणे, आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीसाठी सहयोग करणे इ. प्रकारचे सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी सर्व विभाग मिळून आपापला सहयोग देतील.
प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षणात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण साहित्य, पुस्तिका, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाते. प्रशिक्षणार्थी हे स्वखर्चाने येतात, हे विशेष. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना प्रमाणपत्रही दिले जात आहे. एकंदर ग्रामीण भागातील उत्पादनांवर तेथेच प्रक्रिया करुन उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी हा प्रशिक्षण उपक्रम मोलाचा ठरेल.