नवी दिल्ली : शेतीला आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांनी आज (दि.२४) गुरुवारी कृषी विषयावरील वेबिनारमध्ये बोलताना दिली. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेमुळे छोटा शेतकरी सावरला गेला असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, आतापर्यंत या योजनेद्वारे ११ कोटी शेतकऱ्यांना पावणे दोन लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
या योजनेतही आपण’स्मार्टनेस’ चा अनुभव घेऊ शकतो. केवळ एका क्लिकद्वारे ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग होणे ही प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने गर्वाची बाब आहे.
गेल्या सात वर्षांच्या काळात बियाण्यांपासून ते बाजारापर्यंत अनेक नव्या व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. जुन्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत. केवळ सहा वर्षात कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये कितीतरी पटीने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण अडीच पटीने वाढले आहे.
Pm modi : वाहतुकीसाठी पीएम गती-शक्ति योजना
यावेळच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिक आणि स्मार्ट बनविण्याच्या अनुषंगाने सात मार्ग सुचविण्यात आले आहेत. गंगा नदीकिनारी मिशन मोडवर नैसर्गिक शेती करणे, कृषी आणि फलोद्यानात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खाद्य तेलाची आयात कमी करण्यासाठी पाम तेल मिशन सशक्त करणे, शेतीशी संबंधित उत्पादनांच्या वाहतुकीसाठी पीएम गती-शक्ति योजना राबवून लॉजिस्टिक्सच्या नव्या व्यवस्था तयार करणे, ऍग्री वेस्ट मॅनेजमेंटला जास्त संघटित करणे, वेस्ट टू एनर्जी द्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे आदी मार्गांचा यात समावेश आहे.