अकोला दि.२३: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि.२५ रोजी मुर्तिजापूर तालुक्यात जनसंवाद यात्रा करणार आहेत.
जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमुळे बाधित गावांमधील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत या जनसंवाद यात्रेत उपाययोजना केल्या जाणार आहेत. या यात्रे दरम्यान पालकमंत्री कडू हे पोही लंघापूर, माना, जांभा व रोहणा येथील पुनर्वसन होत असलेल्या जागांची व नागरी सुविधांची पाहणी करतील. मौजे जांभा येथील नागरिकांसमवेत चर्चा व समस्या निराकरण करुन नागरिकांना ताबा पावती व भुखंड वाटप, तसेच रेशनकार्ड वाटप, विविध आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप, शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे. पुनर्वसित गावांमध्ये कामगार नोंदणी, आधार नोंदणी, सात बारा उतारे, आठ अ इ. उतारे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणे, महिलांसाठी आरोग्य तपासणी, रक्ततपासणी इ. सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.