अकोला दि.२३ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तइयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा घेऊन त्यातील सर्वोत्तम ५० व अन्य गटांतील २५ अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांना नीट, आयआयटी, जेईई परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत शिकवणी देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबविला आहे. हा उपक्रम वसीमसर चौधरी कोचिंग क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे. रविवार दि.६ मार्च रोजी होणाऱ्या पूर्वचाचणी परीक्षेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या उपक्रमात गुणवत्तेच्या आधारे निवडलेले ५० विद्यार्थी, पाच दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य पाच, शहीद सैनिकांचे पाल्य पाच, कोरोनामुळे मयत झालेल्या पालकांचे पाल्य पाच, अनाथ विद्यार्थी पाच असे एकूण ७५ विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाणार आहे.
ही निवड पूर्व व मुख्य अशा दोन स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाईल. त्यासाठी सध्या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या व या परीक्षेसाठी इच्छुक म्हणून नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची रविवार दि.६ मार्च रोजी सकाळी ११ ते १२ यावेळात पूर्व परीक्षा (ऑफलाईन) होईल. ही परीक्षा २०० गुणांची असेल. त्यात गणित १०, विज्ञान २०, बुद्धिमत्ता चाचणी २० असे ५० प्रश्न २०० गुणांसाठी असतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.wasimsirschaudharyclasses.com या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याकडे मोबाईल नसल्यास त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापकांनी नियुक्त केलेल्या शिक्षक- कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरुन वा त्यांच्या सहकार्याने नोंदणी करावी. नोंदणीसाठी क्युआर कोडही शाळांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहेत. पूर्व परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे तसेच www.wasimsirschaudharyclasses.com या वेबसाईटवर प्रदर्शित केला जाईल. पूर्व परीक्षेतील गुणांकनाच्या आधारे २५ टक्के विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. मुख्य परीक्षा चौधरी कोचिंग क्लासेस ईक्विनॉक्स स्टडी हब, शास्त्री नगर, अकोला येथे दि. ९ एप्रिल रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. गुणवत्तेच्या आधारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना वसिम सर चौधरी कोचिंग क्लास मार्फत संपूर्ण अभ्यासाचे साहित्य, पुस्तके, लायब्ररी, तांत्रिक सुविधा, टेस्ट सिरीज, सराव परीक्षा इ. सुविधा मोफत पुरविल्या जातील. परीक्षेत अकोला जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास ॲपल लॅपटॉप व अन्य ७४ विद्यार्थ्यांना स्ट्डी टॅब बक्षीस म्हणून देण्यात येईल.
यासंदर्भात विद्यार्थ्यांना अडचणी वा शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा- ८८७८८७३१८८, ८८७८८७३२८८,८९५६०६१७५५, ८९५६०६१७५६, ८९५६०६१७५७, ८९५६०६१७५८, ८९५६०६१७५९.