बंगळूर : उडुपी येथील विद्यार्थिनी आणि हिजाब प्रकरणातील एक याचिकादार हजरा शिफाच्या भावावर काहीजणांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. शिवाय हिजाब परिधान करण्याच्या आपल्या निर्णयाचा संबंध हिंसाचाराशी असल्याचे हजराने म्हटले आहे. सोमवारी रात्री 9 वाजता उडुपी जिल्ह्यातील मालपे बंदरावरील बिसमिल्ला हॉटेलमध्ये शिफाचा भाऊ सैफवर हल्ला झाला. युवकांच्या एका गटाने आपल्या भावावर अमानुष हल्ला केला. हिजाब हा आपला हक्क आहे. तो मिळवण्यासाठी आपला लढा आहे. हा लढा लढत असल्याने आपल्या मालमत्तेचे काहीजणांकडून नुकसान केले जात आहे. आपला हक्क मागणे चुकीचे आहे का? त्यांचे पुढील लक्ष्य कोण आहे? गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणी शिफाने ट्विटद्वारे केली आहे.
गेल्या डिसेंबरच्या अखेरीस हिजाबविरुद्ध आंदोलन सुरु झाले. हे आंदोलन केवळ एका कॉलेजपुरते मर्यादित होते. त्यानंतर हा वाद वाढत गेला. आज राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन, निदर्शने सुरु आहेत. कर्नाटकासह काही राज्यांमध्येही हा वाद सुरु आहे. याविरुद्ध काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. अंतरिम आदेश देताना न्यायालयाने कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये हिजाब, भगवा शेला किंवा इतर कोणतेही धार्मिक संकेत असणारे चिन्ह वापरता येत नसल्याचे सांगितले.
न्यायालयीन आदेशानंतरही विद्यार्थिनींनी हिजाबचा वापर सुरुच केला आहे. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. शिमोग्यातील काही विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता याचिका दाखल केलेल्या विद्यार्थिनीच्या भावावर हल्ला केल्याने हा वाद पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.