एसटी विलनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती आज राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचार्यांची विलनीकरणाची मागणी वगळता सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. सर्व कर्मचार्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरणाचा मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने यावर एक समिती गठीत केली. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विलिनीकरणाचा मुद्दा वगळता कर्मचार्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, असे सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले.
२८ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरु आहेत. साडेतीन महिन्यांहून अधिक काळ हा संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्यात एसटीच्या मर्यादीत फेर्या सुरु आहेत. अद्याप एसटी पूर्ण क्षमतेने सुरु झालेली नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार्या सुनावणीकडे लागले आहे.