Ahmedabad serial bomb blast case : २००८ मधील अहमदाबादमधील २१ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यातील ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २६ जुलै २००८ रोजी झालेल्या अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता.
विशेष न्यायमूर्ती एआर पटेल यांनी निकाल देताना बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये, तर गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
बॉम्बस्फोट प्रकरणी पहिली अटक झाल्याच्या १३ वर्षानंतर यातील ४९ आरोपींना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. यात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात ११०० जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या.
इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सीमी) माजी विद्यार्थी आणि नेता सफदर नागोरी याचाही दोषींमध्ये समावेश आहे. दरम्यान, न्यायालयाने पुराव्यांअभावी २८ जणांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. या २७ जणांनी सुमारे १३ वर्षे तुरुंगवास भोगला आहे. यातील नावेद कादरी याला स्किझोफ्रेनियाच्या आजारामुळे तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.
२००८ मध्ये झालेल्या हल्ल्यात (Ahmedabad serial bomb blast case) पहिल्यांदाच हॉस्पिटल्सना लक्ष्य करण्यात आले होते. सिव्हिल हॉस्पिटलमधील ३७ जणांचा यात मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्यासाठी आलेल्या लोकांचा या बॉम्बस्फोटात बळी गेला होता. तर एक बॉम्बस्फोट एलजी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला होता. यात कोणीही जखमी झाले नव्हते.
या प्रकरणी अहमदाबाद आणि सूरतमध्ये ३५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. अहमदाबादमध्ये २० आणि सूरतमध्ये १५ एफआयआर नोंद झाले होते. या घटनेनंतर विविध ठिकाणांहून २९ न फुटलेले बॉम्ब सापडले होते. इंडियन मुजाहिदीन या संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि हे कृत्य २००२ च्या दंगलीचा बदला म्हणून केल्याचा दावा त्यांनी केला होता.