हिवरखेड (धिरज बजाज)-: हिवरखेड येथील लालाजी नगर मध्ये स्थित सेंट पॉल अकॅडमी आणि सातपुडा कला वाणिज्य महाविद्यालय कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आमदार निधी मधून मंजूर असून दि. रोजी या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. परंतु अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे बोल्डर आथरून ठेवलेले आहेत. त्याची योग्यप्रकारे प्रेसिंग करण्यात आली नाही.
तसेच पुढील काम ठेकेदाराकडून बऱ्याच दिवसांपासून रखडलेले असल्यामुळे सदर बोल्डर हजारो विद्यार्थ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर हजारो चिमुकले विद्यार्थी, कॉलेजचे युवक-युवती, महिला शिक्षिका, शिक्षक, पालक वर्ग, स्कूल बस, ऑटो, इत्यादींची मोठी वर्दळ असून सर्वांनाच अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु ठेकेदाराला आणि संबंधित अधिकाऱ्यांना याच्याशी काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे. जर अनेक दिवसांपासून जीव घेणे बोल्डर तसेच विखुरलेले असतील तर पुढे चालून या रस्त्याचा दर्जा आणि सिमेंटचा वापर कसा राहील? याबाबत सुद्धा पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या मनात चिंता आहे.
त्यामुळे संबंधित ठेकेदार, अधिकारी, आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम त्वरित करावे आणि दर्जेदार करावे अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.