विदर्भ वाईन शॉप परवाना प्रकरणात मद्य सम्राट राजु उर्फ राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वालने जामीन मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली, आणि सात दिवसात शरणागती पत्करण्याचे आदेश न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. जे. के. माहेश्वरी यांच्या पीठाने पारित केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश कायम ठेवीत जयस्वालचा जमीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये जयस्वालला पोलिसांकडे शरणागती पत्करणे क्रमप्राप्त आहे.
विदर्भ वाईन शॉपचे मूळ परवानाधारक दर्यापूर तालुक्यातील मौजे कडाशी येथील रहिवासी पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांना वीस वर्षापासून मृत असूनही त्यांना जिवंत दाखवून, दारू विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याने, अकोला राज्य उत्पादन शुल्क संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, कडाशी येथील रहिवासी पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांच्या नावाने १९७३ साली देशी व विदेशी मद्य विक्रीचा परवाना राज्य शासनाने मंजूर केला होता. परंतु दारू व्यवसाय एकट्याला सुरू करणे शक्य नसल्याने, अकोला येथील रहिवासी ब्रिजकिशोर जयस्वाल यांच्या सोबत भागीदारी करून, १९७६ साली अकोला शहरात विदर्भ वाईन शॉप नांवाने दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला होता.