अकोला, दि.15: दिव्यांगाना त्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र तातडीने मिळावे यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार, अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार ते शनिवार, अकोट येथे प्रत्येक बुधवार व गुरवार तर मुर्तिजापूर येथे शुक्रवारी या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात, जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग कल्याण कृती आराखडाबाबत आज बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते.
दिव्यांगांना युडीआयडी व अस्थिव्यंग प्रमाणपत्र तातडीने मिळावे, याकरीता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व दिव्यांगानी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र आधार कार्ड व अस्थिव्यंग प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध व्हावे, याकरीता अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दोन या वेळात सर्व प्रकारच्या दिव्यांगत्व तपासण्या होतील. तसेच ग्रामिण रुग्णालय अकोट येथे अकोट व तेल्हारा तालुक्यातील दिव्यांगांसाठी ग्रामिण रुग्णालय अकोट येथे प्रत्येक बुधवार व गुरुवारी सकाळी १० ते दोन यावेळेत फक्त अस्थिव्यंग तपासण्या होतील. तर मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवारी सकाळी १० ते दोन यावेळात अस्थिव्यंग, नेत्र, मनोविकृती, बाल रोग उपचार, मेडिसिन (खुजेपणा, चेतासंस्था, थॅलेसेमिया, सिकलसेल इ.) तपासणी होईल. तरी त्या त्या तालुक्यातील दिव्यांगांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. उर्वरित तालुक्यातील दिव्यांगांच्या तपासणीची सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तिंना दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे व ते एकाच ठिकाणी मिळावे, त्यासाठी त्यांना कष्ट कमीतकमी व्हावे. तसेच याच प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभही मिळावा यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या योजनेच्या लाभ देण्याकरीता युडीआयडी कार्ड व अस्थिव्यंग प्रमाणपत्र शिबीराच्या माध्यमातून प्राधान्याने उपलब्ध करुन द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी यंत्रणांना दिले.