सोलापूर: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये सोलापूरचे चारजण जागीच ठार झाले. असल्याची माहिती मिळत आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम एच 13 बी एन 7122 क्रमांकाच्या या स्विफ्ट कारमध्ये काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चारजण सोमवारी रात्री मुंबईला निघाले होते आणि याच गाडीचा भीषण अपघात झाला आहे. याची माहिती मिळताच काँग्रेसचे नगरसेवक तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनोद भोसले यांनी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे हे सध्या खोपोलीकडे निघाले आहेत. अद्यापही मृतांची अधिकृत नावे समोर आलेली नाहीत.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झाले.