हिवरखेड (धीरज बजाज)- अकोट अकोला रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा गंभीर आरोप आदर्श पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच या संघटना कडून करण्यात आला आहे.
सविस्तर असे की अकोट अकोला ह्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्याचवेळी या मार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी सुद्धा झाली होती. त्यामुळे या मार्गावरून तात्काळ रेल्वेसेवा सुरू होईल. अशी वाजवी अपेक्षा परिसरातील रेल्वे प्रवाशांना होती. परंतु सुरुवातीला कोरोना निर्बंधांमुळे उशीर करण्यात आला. नंतर अनेक महिन्यापासून अकोट रेल्वे स्टेशन तथा अकोट- अकोला रेल्वेमार्ग आणि प्रवाशी रेल्वेसेवा इत्यादींचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, अथवा केंद्र सरकारच्या अन्य मोठ्या वजनदार मंत्र्यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याने या रेल्वेसेवा आणि स्थानकाचे उद्घाटन रखडले असल्याची चर्चा सुरू होती. दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या नांदेड डिव्हिजनच्या टाईम टेबल मध्ये काही महिन्यांपूर्वी अकोट अकोला पूर्णा ह्या डेमु रेल्वेचा टाईम सुद्धा जाहीर करण्यात आला होता. पण नंतर या परिसरातील रेल्वे प्रवाशांवर अन्याय करणारा निर्णय घेत अकोट पूर्णा रेल्वेसेवा अकोट ऐवजी पूर्णा ते अकोला पर्यंतच सुरू करण्यात आली.
अश्याप्रकारे जाणीवपूर्वक रेल्वे सेवा सुरू न करणे कितपत योग्य आहे? असा सवाल जनता उपस्थित करीत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यशस्वी चाचणीनंतर अकोट येथून रेल्वेसेवा सुरू करण्यास प्रचंड विलंब होत असल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न रेल्वे प्रवाशांच्या मनात खदखदत आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आले असताना त्यांनी अकोट येथील ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. अकोट येथील ओव्हर ब्रिज वरून रस्ते वाहतूक सुरू झाली असतानाही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही हा हिवरखेड अकोट परिसरातील रेल्वे प्रवाशांवर मोठा अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया आदर्श पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच कडून देण्यात आली. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बॉक्स रेल्वे प्रवाशांच्या प्रमुख मागण्या
अकोट येथून मुंबई, दिल्ली, नांदेड, हैद्राबाद, पुणे, यासह महत्वपूर्ण ठिकाणांसाठी रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी.
900 कोटींचे बजेट मंजूर झाल्याने अकोट- हिवरखेड- खंडवा- इंदौर या मार्गातील उर्वरित टप्प्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे.
या मार्गाच्या गेज परीवर्तना सोबतच दुहेरीकरण आणि विद्युतीकरण सुद्धा करण्यात यावे.
अकोट येथे पिट लाईन निर्मिती करावी.
रेल्वेचे जाळे कमी असल्याने हिवरखेड तेल्हारा शेगाव आणि अकोट जळगाव जामोद बुऱ्हाणपूर या नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यात यावे.
ह्या मागण्या पूर्ण करून रेल्वे प्रवाश्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी आदर्श पत्रकार संघ आणि हिवरखेड विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.