अकोला,दि.9 : अकोला वनविभागाव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त माळराजूरा येथे कौटुबिक स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आजच्या कोरोना काळातही आवश्यक असून महिलांनी स्वच्छतेकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहन अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी आज माळराजूरा येथील वनपर्यटन केंद्रात केले.
वनक्षेत्रालगतच असलेल्या माळराजूरा गावातील गावकऱ्यांनी वनविभागास सहकार्य करून वनक्षेत्र संरक्षणाचे उत्तम कार्य केल्याबद्दल वनक्षेत्रात इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे माळराजूरा गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच वनक्षेत्रालगतच्या माळराजूरा गावातील महिलांना इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या फॅमिली हाईजिन किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी गावकऱ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, आपणास विविध आजारांमुळे आरोग्यासोबतच आपल्या रोजगारावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपला परिसर स्वच्छतेच्या माध्यमातून व होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्याकरीता आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी केले.
आपले जंगल वाचले तरच आपण वाचू शकतो. त्यामुळे वनसंवर्धनाच्या कामात कार्यरत असणाऱ्यांसाठी रेडक्रॉस सोसायटी सातत्याने वनालगतच्या गावात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरून आपले जंगल व आपले गाव स्वच्छ व निरोगी राहील, असे मनोगत रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजित सिंग बछेर यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी मोहन काजळे व माळराजूरा वनसमितीचे अध्यक्ष शिवाजीराव घुगे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सावरखेड नियतक्षेत्राचे वनरक्षक स्वप्नील देशमुख यांचेसह उपस्थित मान्यवरांनी माळराजूरा गावातील महिलांना कौटुंबिक स्वच्छता पाकीटांचे वितरण केले. कार्यक्रमात कर्ते निसर्ग कट्टाचे अमोल सावंत यांनी तयार केलेल्या वनवा विरोधी पत्रकाचे विमोचन अर्जुना के.आर यांच्या हस्ते करण्यात आले. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदने यांनी आभार प्रदर्शन केले.