अकोला दि.३१: कोविड संक्रमणाचा वेग वाढत असून त्यासाठी चाचणी, संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धते सोबतच वयवर्षे १५ ते १७ वयोगटातील युवक युवतींच्या लसीकरणाचा वेग वाढवावा, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड-१९ च्या उपाययोजना संदर्भात जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मनिष शर्मा, डॉ. आदित्य महानकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेतील, शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात १५ ते १७वयोगटातील युवक युवतींचे लसीकरण सुरु आहे. मात्र लसीकरणाचे प्रमाण अल्प असून वेग वाढविणे आवश्यक आहे. याकरीता शाळा, महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहीत करावे. सर्व शाळा व खाजगी शिकवणीनिहाय लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण डोसेस व अन्य सामुग्रीचे नियोजन करावे. तसेच पहिला डोस घेतलेल्यांनी दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा. ग्रामिण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दुसरा डोस घेण्याबाबत लोकांना आवाहन करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक उपचार सुविधांची उपलब्धता, रुग्ण संख्या वाढीच्या दरानुसार आवश्यक खाटा, औषधी व गरज भासल्यास ऑक्सिजन आदींची उपलब्धता करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. तसेच सानुग्रह अनुदानबाबत आढावा घेण्यात आला. कोविडमुळे मृत्यू झालेल्या १ हजार ३४० व्यक्तिंच्या वारसांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी यावेळी दिली.