अकोला,दि.27: जिल्ह्यातील बेघर व्यक्तिंना निवासाची सुविधा अधिक उत्तम देण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त इमारतीचे निर्माण करण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा व आाशाकिरण महिला विकास संस्थाव्दारे संचलीत संत गाडेबाबा बेघर निवारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, मनपा उपायुक्त पंकज जवजाळ, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील, आशाकिरण महिला विकास संस्थाचे अध्यक्ष दुर्गा भड, व्यवस्थापक उषा राऊत, आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असणाऱ्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन द्या. प्रत्येकाला सहायता अनुदान मिळेल याकरीता आवश्यक ती कार्यवाही तातडीने करा. तसेच प्रत्येकांना रेशन कार्ड तयार करुन धान्य उपलब्ध करुन द्या. बेघर निवारा केंद्रात राहत असलेल्या महिला व पुरुषांचा बचत गट तयार करुन त्याच्या शारिरीक क्षमता व पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन द्या. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी बेघर निवारातील महिला व पुरुषांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वस्त केले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी बेघर निवारातील सर्वांना जॅकेट वाटप केले व त्यांच्यासोबत अल्पोहाराचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनिष हिवराळे यांनी केले.