हिवरखेड(धिरज बजाज):- राज्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यात अकोला जिल्ह्यात ही कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. या कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर कोरोनाचे रूग्ण आटोक्यात नाही आले तर दिवसा पण संचारबदी लागते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लग्न समारंभ, जमावबंदी, डीजे, संबळ वाद्य, वऱ्हाडी यासह शुभकार्यावर ही गाजावाजा न करता पडदा पडला आहे. शहरासह ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचे नियम पाळत अगदी साधेपणात ‘शुभमंगल’ होत आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र भीती परसली आहे.यात ग्रामीण भागानेही रुग्ण निघू नये म्हणून धास्ती घेतली आहे.
प्रशासनाकडून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून कोरोना बाबत मोठी जनजागृती करण्यात आली असली तरी मात्र ग्रामीण भागात कोरोनाबाबत भीतीचे सावट कायम आहे. सध्या प्रशासनाकडून काही ठराविक शुभकार्यासाठी निर्बंधासह परवानगी असल्याने ग्रामीण भागात नातेवाईकासह वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्यासाठी संचारबंदी अडसर ठरत असल्याने शुभविवाह शॉर्टकट मध्ये होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जवळच्या नातेवाईकांना आणि रक्तातील नात्यातील लोकांना या विवाह सोहळ्यास हजेरी लावता येत नाही. यामुळे विवाह सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉलद्वारे नवनवीन शक्कल लढवीत वर व नववधूना शुभेच्छा देण्यात येत आहे. अगदी साद्या आणि सोप्या पद्धत्तीने, गाजावाजा न करता विवाह सोहळे ग्रामीण भागातही होत आहे. फोन वरूनच ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्याची वेळ लग्नात येऊ न शकणाऱ्या वऱ्हाडी मंडळीवरही येत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही महागडे डीजे, संबळ वाद्यांना मोठी मागणी असते. हळद, आणि लग्नाच्या रात्रीला ग्रामीण भागात चालणारी निकासी, वरात वाजंत्र्यासह नाचणाऱ्यांना घाम फोडणारी असते. तरुणांचा या वरातीकडे मोठ्या प्रमाणावर कल असतो. मात्र अशा परिस्थितीमुळे साऱ्यांचाच हिरमोड झाला आहे. या नियमांमुळे हलाखीच्या परिस्थीतीतील वरवधूचे पालक शुभमंगल म्हणत आहेत तर मोठा गाजावाजा करून लग्न करू इच्छित व्यक्तींवर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे..
कही खुशी कही गम
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंत छोटेखानी स्वरूपात लग्न होत असल्याने लग्नाच्या अवाढव्य खर्चात बचत होत असल्याने गोरगरीब व सामान्य परिस्थितीचे वर वधू व त्यांचे कुटुंबीय समाधानी दिसत असून एक प्रकारे ते कर्जबाजारी होण्यापासून वाचले असेच म्हणावे लागेल त्यामुळे शासनाचा नियम त्यांच्यासाठी दिलासादायक असल्याचे चित्र आहे.
तर दुसरीकडे शुभ कार्यांवर शासनाचे निर्बंध आणि अटी शर्ती लागु असल्यामुळे बिछायत, मंडप, डेकोरेटर्स, भवन, मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, आचारी, स्वयंपाकिन महिला मंडळी, महाराज, पंडितजी, बँड पथक, साऊंड, डीजे, गायक, ऑर्केस्ट्रा, घोडा, बग्गी, फुलवाले, सजावट, पाणी कॅनवाले, मजूर वर्ग, स्वच्छता कामगार, इत्यादी शेकडो प्रकारच्या विवाह सेवा संबंधित व्यावसायिक यांच्या पोटावर पाय पडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे प्रशासनाने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे अशी मागणी तेल्हारा तालुका बिछायत मंडप डेकोरेशन असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. अशी माहिती अध्यक्ष दीपक वैष्णव, उपाध्यक्ष धिरज बजाज, सचिव विजय मानके इत्यादींनी दिली आहे.