अकोला- राष्ट्रीय सण उत्सव या काळात कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज प्रतिकृतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार अशा वापरावर बंदी असुन असा वापर करणारे नागरिक, उत्पादक, विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय, अशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठाने, स्थानिक प्राधिकरणे, शैक्षणिक संस्था,कार्यालये, प्रतिष्ठाने व प्राधिकरणे तसेच इतर संस्थांनी ध्वजरोहणाच्या वेळी ध्वज वापराबाबत भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले, जीर्ण व खराब झालेले ध्वज वापरू नये किंवा माती लागलेले तसेच रस्त्यावर, मैदानात पडलेल्या राष्ट्रध्वज प्रतिकृती गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत. विल्हेवाट लावण्याकरीता गोळा केलेले राष्ट्रध्वज व राष्ट्रध्वज प्रतिकृती तालुका पातळीवर तहसिलदार कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत. राष्ट्रध्वज प्रतिकृतींची परस्पर विल्हेवाट लावल्याचे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी नियंत्रण व जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणामार्फत ही बाब विद्यार्थी व नागरिकांच्या निदर्शनास आणुन देण्याकरीता सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.