सातारा : सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये बंद झाली आहेत. मात्र महाविद्यालयांची वसतिगृहे मात्र सुरुच आहेत. बर्याच प्रवेशितांनी संसर्गाच्या धास्तीने वसतीगृहांकडे पाठ फिरवली असली तरी वसतीगृहांची फी मात्र सुरुच आहे. कोरोना काळात जेवढे वास्तव्य तेवढ्याच दिवसांची वसतीगृह फी आकारली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून होत आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये शाळा-महाविद्यालये टप्प्या-टप्प्याने सुरु झाली. कोचींग क्लास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु झाली होती. ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे महाविद्यालय व परिसरातील वसतिगृहांमध्ये राहणे पसंत करतात. येण्या-जाण्याचा त्रास कमी व्हावा, प्रवासाचा वेळ व खर्च वाचवण्यासाठी वसतिगृहाची निवड केली जाते. काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करणे परवडणारे नसते असे विद्यार्थीच वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतात. काही वसतीगृहांमध्ये दोन टप्प्यात तर काही वसतीगृहांमध्ये एकरकमी फी भरुन मगच प्रवेश दिला जातो. हीच पध्दत जिल्ह्यासह मोठ्या शहरांमधील महाविद्यालये व वसतिगृहांमध्ये सर्रास वापरली जात आहे. परंतू सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामुळे वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी घरी गेले आहेत. सध्या वसतिगृहांमध्ये स्पर्धापरीक्षा अथवा तत्सम क्लास करणारे विद्यार्थीच राहत आहेत.
ऑक्टोबरमध्ये शाळा महाविद्यालये सुरु झाल्यामुळे बहुतांश वसतिगृह पूर्ण क्षमतेने प्रवेश झाले होते. मात्र आता सर्व महाविद्यालये बंद झाल्याने केवळ तीन महिन्यांसाठी त्यांना एक वर्षांची वसतीगृहाची फी भरावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. ग्रामीण भागातून येणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी व सामान्य कुटुंबातील आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे जेवढे दिवस वसतिगृहात वास्तव्य आहे, तेवढ्याच दिवसांचे शुल्क आकारले जावे, एकदम सहामाही किंवा वार्षिक फी आकारु नये, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून जोर धरु लागली आहे.
संसर्गाची टांगती तलवार…
महाविद्यालये बंद असली तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी अभ्यासासाठी वसतिगृहातच राहतात. मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरचा वापर केला जात असला तरी बहुतांश वसतिगृहांमध्ये 20 ते 25 सदस्यांमागे एक स्वच्छतागृह व स्नानगृह अशी संकल्पना असते. तसेच ती दिवसातून एकदाच स्वच्छ केली जातात. तसेच एकाच मेसमध्ये जेवण केले जाते. त्यामुळे संसर्गाचा धोका संभवतो. यामुळे वसतिगृहात राहूनही संसर्गाची टांगती तलवार सदैव कायम राहत आहे.