अकोला,दि.10: कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकाराचा फैलाव बंदिस्त जागेत अधिक वेगाने होण्याची शक्यता असते त्यास रोखण्यासाठी लोकांची गर्दी होण्याची ठिकाणे जसे सिनेमा हॉल, नाट्यगृह या मनोरंजन केंद्राच्या बंदीस्त जागेमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व सिनेम हॉल, ऑडीटोरियम या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
१. सिनेमा, थिएटर्स, मल्टीप्लेक्स, प्रेक्षागृहाची व्याप्ती एकूण आसान क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
२. जिल्ह्यातील सर्व सिनेमा हॉल चालकांनी, मालकांनी सिनेमा बघण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची आरटीपीसीआर, रॅपीड चाचणी करण्यात यावी. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी महानगरपालिका, अकोला यांच्याशी संपर्क करावा.
३. आरटीपीसीआर, रॅपीड चाचणी करण्याकरीता स्वतंत्र बुथची व्यवस्था करण्यात यावी. याकरीता जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिका तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांचे सहकार्य घ्यावे.
४. प्रवेश करणाऱ्या सर्व नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दोन मात्रा केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
५. प्रेक्षक तसेच कर्मचारी यांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
६. सामाजिक अंतर च्या नियमांचे पालन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटांचे सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी.
७. विक्री काऊंटर वर गर्दी टाळण्यासाठी तिकीट, पॅकींग केलेले खाद्यपदार्थ आणि पेय इत्यादींच्या पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस डिजिटल व्यवहारांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात यावे.
८. संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेवर भर देणे, संपूर्ण परिसराची वारंवार स्वच्छता करणे, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणारे सर्व बिंदू, हँडल, रेलिंग यासह सर्व बिंदू सुनिश्चित केले जातील आणि प्रत्येक स्क्रिनिंगनंतर सभागृहे स्वच्छ केली जातील याची दक्षता घेण्यात यावी.
९. पार्कींगच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.
१०. कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला संबंधीत आस्थापना यांनी तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच संबंधित आस्थापनांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल.
११. याबाबत काटेकोर तपासणी करण्याची जबाबदारी अनुज्ञप्ती प्राधिकारी, आयुक्त मनपा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची असेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.