अकोला, दि.8 : वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन या योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षाकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेसंबंधीचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुक वृद्ध साहित्यिक व कलाकार यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दि.३१ जानेवारी २०२२ पूर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
पात्रतेचे निकष- साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती, कला व वाड.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे; अशा व्यक्ती, ज्या स्त्री / पुरुष कलाकारांचे व साहित्यिकांचे वय ५० वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती, जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायु, क्षयरोग, कृष्ठरोग, कर्करोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना ४० टक्के पेक्षा जास्त शारिरीक व्यंग असेल किंवा अपघाताने ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वत:चा व्यवसाय करू शकत नसतील, असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल.
ज्या साहित्यिक व कलावंतांच्या सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न ४८ हजार रुपयांपेक्षा जास्त नाही. वयाने वडील असणाऱ्या विधवा/परितक्ता वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. वरीलप्रमाणे निकषांची पूर्तता करणाऱ्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दि. ३१ जानेवारी २०२२ पुर्वी पोहोचतील अशाप्रकारे पाठवावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-:
१. वृद्ध साहित्यिक व कलावंत पती/पत्नी एकत्रित पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला असावा.
२. अर्जदाराचा बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड क्रमांक (त्यांच्या साक्षांकित प्रतिसह).
३. जन्माचा दाखला.
४. महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा दाखला (ग्रामपंचायत / नगरपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिका यांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी रहिवाशी असल्याबाबतचा दिलेला दाखला),
५. तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
६. रोगाबाबत / अपंगत्वाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
७. इतर शासकीय जनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत,
८. अर्जामध्ये नमुद इतर कलेसंबंधी कागदपत्रे,
९. आधार कार्ड सत्यप्रत,
१०. कला क्षेत्राबाबत लावलेले सर्व कागदपत्रे हे सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले असावेत.
योजनेचा अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र साहित्यिक व कलाकार यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दि.३१ पूर्वी सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.