हिवरखेड(धिरज बजाज)-: आम आदमी का अधिकार म्हणजे “आधार” अशी ज्याची व्याख्या आहे त्या आधार कार्ड मध्ये अपडेट साठी नागरिकांना प्रचंड हेलपाटे घेण्याची वेळ आलेली आहे.
विविध शासकीय बाबींसाठी आधार कार्ड हा नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. एवढेच नाही तर बहुतांश शासकीय योजनांसाठी, बँक खात्यांसाठी, अनेक कार्यांसाठी आधारला मोबाईल नंबर लिंक करून पूर्ण जन्मतारीख आणि संपूर्ण पत्यासह अपडेट करणे अनिवार्य झालेले आहे.
परंतु सध्या हिवरखेड सह तेल्हारा तालुक्यात एखादा अपवाद वगळता आधार नोंदणी केंद्रे आणि दुरुस्ती केंद्र नामशेष झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड पैसा श्रम वेळ वाया जात असून सर्वसामान्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. सध्या तेल्हारा तालुक्यात फक्त तेल्हारा येथील एकच आधार केंद्र सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तेथेही प्रचंड गर्दी असल्याने नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने तात्काळ आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्रे सुरू करावीत तसेच पोस्ट ऑफिस मधील आधार दुरुस्ती सुद्धा सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या संख्येने होत आहे.
वेगळा बॉक्स
शासन म्हणते पोस्ट, पण माहीत नाही गोष्ट
हिवरखेड परिसरात आधार दुरुस्ती केंद्र उपलब्ध नसल्या संदर्भात अनेक वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी धिरज बजाज यांनी चर्चा केली असता आधार अपडेट साठी पोस्ट ऑफिसचा पर्याय उपलब्ध असल्याची त्यांनी माहिती दिली परंतु पोस्ट मध्ये आधार अपडेट होतो ही गोष्ट अनेक सर्वसामान्य जनतेला माहितीच नाही. व त्यासाठी पोस्टाकडून सुद्धा कोणतीच जनजागृती केली जात नाही. दुसरीकडे हिवरखेड पोस्ट ऑफिस मधली आधार मशीन चे रजिस्ट्रेशन रद्द झालेले असून नवीन रजिस्ट्रेशन अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यामुळे शासन म्हणते आधार साठी आहे पोस्ट, पण माहित नाही पूर्ण गोष्ट असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया:-
- हिवरखेड परिसरात आधारची व्यवस्थाच निराधार झाली असल्याने सामान्य नागरिक आधार अपडेट पासून वंचित राहत आहेत. शासनाने तातडीने आधार दुरुस्ती केंद्र सुरू करावेत.
- बाबुराव वाकोडे, कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी हिवरखेड.
- हिवरखेड येथील अनेक आधार दुरुस्ती केंद्रे ब्लॅक लिस्टेड झाल्यामुळे तेथील सुविधा बंद आहेत.
- प्रमोदसिंग ठाकूर, DPM जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.
- हिवरखेड येथील पोस्टाचे आधार सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशन रद्द झाल्याने पुन्हा सुरू करण्यासाठी आधारच्या वरिष्ठांकडे अनेकदा ईमेल केला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
नितीन माठे, पोस्ट विभाग, अकोला.