हिवरखेड (धिरज बजाज): प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात पडत असून मानव प्रजातीने लवकरच परिस्थिती सुधारली नाही तर त्याची खूप मोठी किंमत आपण सर्वांनाच चुकवावी लागणार आहे. प्रदूषण कमी करावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, सायकलिंग द्वारे आरोग्य अबाधित राहावे, बेटी बचाव बेटी पढाव, वृक्ष लावा वृक्ष जगवा, अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यासाठी फक्त गोष्टी करण्यापेक्षा स्वतः काही तरी करून दाखवावे व तमाम जनतेला सुद्धा प्रेरणा मिळावी या ध्येयाने झपाटलेला सायकल वेडा तरुण संदीप नंदापुरे हा अख्ख्या महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करीत आहे.
चालू वर्षातच संदीप ने तब्बल 22 हजार किलोमीटर सायकलिंग चा प्रवास पूर्ण केलेला आहे. या आठवड्यातच विविध ठिकाणी भेट देत पुणे ते शेगाव असा चक्क बाराशे किमीचा प्रवास करून संदीप नंदापुरे यांनी हिवरखेड येथे भेट देऊन सायकल चालविणे आरोग्यासाठी कसे हितकारक आहे यासह विविध विषयांवर जनजागृती केली. पुण्यामध्ये हिताची कंपनीत काम करणारे सायकलप्रेमी संदीप नंदापूर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील वॉलपीस येथील मूळ रहिवासी आहेत. पुण्यावरून सायकल चालवत हिवरखेड गाठले असता जागोजागी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. गजानन महाराज मंदिर हिवरखेड येथे भारत तायडे गुरुजी, हभप संजय मानके, सचिन टीलावत, धिरज बजाज, मनिष भुडके, महादेव आडोळे, ओम भोपळे, यांच्यासोबत मंदिराचे स्वयंसेवक उपस्थित होते.
विशेष म्हणजे संदीप हे दररोज घरून 25 किमी सायकल चालवून कार्यालयात जाणे व 25 किमी परत येणे असा 50 किमी सायकल प्रवास करतात. त्यांच्या या जनजागृतीमुळे प्रेरणा घेऊन अनेक जण सायकलकडे वळतील असा त्यांना ठाम विश्वास आहे.