नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेअंतर्गत (PM-KISAN) दिले जाणारे दोन हजार रुपये 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना दिला जाणारा हा दहावा हप्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारीला रोजी दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेतील. याच दरम्यान सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहेत. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी ‘पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाईटवर करू शकतात.