अकोला: ढगाळ वातावरणामुळे पाऊस होण्याची चिन्हे दिसत असताना, दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास सुसाट वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने बघताबघता रोद्ररुप धारण करीत अकोला शहरासह जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने थैमान घातले. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.
आज मंगळवार २८ डिसेंबर रोजी दुपारी गारा व वादळी वाऱ्यासह सुरु झालेल्या अवकाळी पावसाने पाऊण तासात शहर व जिल्ह्याला धुवून काढले. वाऱ्यासह अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अकोला शहरात गारांचा पाऊस पडला. जिल्ह्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या अवकाळी पावसाचा गारपिटीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून याचा परिणाम रब्बी पिकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसाचा गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अवकाळी पावसामुळे अकोला शहरातील अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी असला तरी गारपिटीमुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसाचा गारपिटीमुळे शहरातील काही भागात घरांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख रस्ते चिखलात
अकोला जिल्हयातील रस्त्याची बिकट अवस्था झाली अनेक मुख्य रस्ते खोदून ठेवल्यामुळे आज झालेल्या अवकाळी पावसाने रस्ते चिखलात गेले असून प्रवासी तसेच वाहनधारकांना या रस्त्यांच्या बिकट परिस्थिती मुळे त्रास सहन करावा लागत आहे.