मुंबई : रेड लाईट एरिया अर्थात लालबत्ती म्हणून परिचीत असलेल्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसर लवकरच कात टाकणार आहे. राज्य शासनाने समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत (क्लस्टर डेव्हलपमेंट) म्हाडा प्रशासनास नोडल एजन्सी म्हणून नेमून या परिसरातील तब्बल 800 हून अधिक जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, येथील सुमारे 2 हजार सेक्स वर्कर मुंबईतून हद्दपार होणार असून कामाठीपुराची ओळख बदलणार आहे.
कामाठीपुरा पुनर्विकास समितीचे कार्याध्यक्ष सुनिल कदम यांनी दैनिक पुढारीला सांगितले की, ब्रिटीश काळात मुंबईतील प्रमुख बांधकाम करण्यासाठी तेलंगना राज्यातील कामगार मुंबईत आले होते. त्यावेळी दलदलीचा परिसर असलेल्या कामाठीपुरा परिसरात संबंधित कामगारांसाठी वसाहत बसवण्यात आली. या वसाहतीमध्ये ब्रिटिशांनी समुद्रमार्गे येणार्या खलाशांसाठी मनोरंजनासाठी व्यवस्था केली होती. प्ले हाऊस म्हणून ओळखल्या जाणार्या या परिसराच्या नावाचा अपभ्रंश झाल्याने पुढे ते पिलाहाऊस असे ओळखले जाऊ लागले.
याचसोबत याठिकाणी अँग्लो इंडियन सेक्स वर्कर खलाशांच्या मनोरंजनासाठी होत्या.
पुढे ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर अँग्लो इंडियन सेक्स वर्करची जागा कन्नड देवदासी महिलांनी घेतली. त्यानंतर पुढे नेपाळी, बांग्लादेशी महिलांसह बंगाली व बिहारी सेक्स वर्कर बाजारात कामासाठी आल्या. मात्र आता त्यांची संख्या नगण्य आहे. अवघ्या चार गल्ल्यांमध्ये हा देह विक्री व्यवसाय सुरु असतानाही संपूर्ण कामाठीपुर्याकडे बघण्याची नजर नकारात्मक झाली. ती आता बदलेल.
सुमारे 80 ते 100 वर्षांपूर्वीच्या 850 ते 900 इमारती कामाठीपुरा परिसरात आहेत. कामाठीपुरातील 800हून अधिक जमिन मालकांपैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या इमारतीेंचा पुनर्विकास रखडला आहे. त्याची झळ या इमारतींमध्ये राहणार्या सुमारे 9 हजारांहून अधिक भाडेकरुंना सहन करावी लागत आहे. म्हाडा नोडल एजन्सी म्हणून या इमारतींच्या पुनर्विकासात मोलाची भूमिका बजावणार असल्याने भाडेकरुंसह जमिन मालकांनाही आता पुनर्विकास होईल, असा विेशास वाटत आहे.
गेली 40 वर्षे कामाठीपुर्याने शरीर विक्रीचा व्यवसाय पाहिला आहे. कामाठीपुरा म्हणजे वेश्यावस्ती, असाच समज त्यातून निर्माण झाला. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. कामाठीपुर्याच्या काहीच भागांत ही वेश्यावस्ती होती. ती देखील आता कमी होत चालली आहे. ज्या कामाठीपुर्यात पूर्वी तब्बल 90 हजार वेश्या होत्या तिथे आज त्यांची संख्या जेमतेम 2 हजारांवर आली आहे. बहुतांश वेश्यांनी मुंबईबाहेर स्थलांतर करीत जवळची उपनगरे किंवा शहरे गाठली. मागे राहिलेल्या वेश्या देखील पुनर्विकासानंतर कामाठीपुर्यात दिसण्याची शक्यता नाही.