२५ जून १९८३ या दिवसाने जगाची आणि भारतीय क्रिकेटची दिशाच बदलली. ३८ वर्षांपूर्वी त्या दिवशी भारतीय क्रिकेटने पहिला विश्वचषक (83 world cup) जिंकून इतिहास रचला होता. सलग दोन विश्वचषक जिंकून सलग तिस-यांदा फायनल गाठणाऱ्या दिग्गज वेस्ट इंडिज भारताने पराभवाची धूळ चारली. २४ वर्षीय कपिल देवच्या नेतृत्वाखालील खेळणा-या भारतीय संघाची ही कामगिरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली. भारतीय संघ क्लाईव्ह लॉईडच्या मातब्बर संघावर विजय मिळवेल असे कुणाला त्यावेळी स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण, इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर त्या दिवशी जे झाले ते क्रिकेट चाहते कधी विसरू शकणार नाहीत.
भारताने पहिला विश्वचषक (83 world cup) जिंकण्याच्या ऐतिहासिक घटनेला आता ३८ वर्षे उलटून गेली आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंतचा प्रवास करून टीम इंडियाने आधीच जागतिक क्रिकेटला चकित केले होते. विजेतेपदाचा सामना बलाढ्य वेस्ट इंडिजविरुद्ध होता. जीवघेण्या वेगवान गोलंदाज आणि जबरदस्त फलंदाजांनी भरलेल्या त्या संघाचा क्लाइव्ह लॉईड कर्णधार होता.
१९७५ आणि १९७९ चा विश्वचषक (83 world cup) जिंकून वेस्ट इंडिज विजयी रथ थांबवणे कठीण होते. कॅरेबियन संघासमोर भारतीय संघाला हलके मानले जात होते. ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजी करताना सर्व तयारी करण्यात आली होती. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग यांसारख्या भयानक वेगवान गोलंदाजांसमोर संपूर्ण भारतीय संघ अवघ्या १८३ धावांत गारद झाला. प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघ विजयाचे लक्ष्य सहजच गाठेल आणि सलग तिस-यांदा विश्वचषकावर नाव कोरेल, यात कुनालाच शंका आली नाही. त्यामुळे मैदानावरील भारतीय चाहत्यांनी सामन्याकडे पाठ फिरवून परतीचा मार्ग धरला. खुद्द कपिल देव यांची पत्नीही नाराज होऊन हॉटेलमध्ये परतली. पण त्यादिवशी भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता.
ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार कपिल देवने आपल्या खेळाडूंच्या कानात कोणता मंत्र फुंकला माहीत नाही, पण भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला १४० धावांतच गुंडाळले. क्लाइव्ह लॉईड, व्हिव्हियन रिचर्ड्स, डेसमंड हेन्स यांसारख्या दिग्गज फलंदाजांनी सज्ज असलेल्या वेस्ट इंडिज संघाचे ७ खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.
त्या ऐतिहासिक विजयानंतर (83 world cup) टीम इंडियाने त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा केला. त्याच्या आनंद साजरा करण्याच्या घटनेशी संबंधित काही मजेदार आठवणी आहेत. त्यावेळच्या संघाचे सदस्य आणि वेगवान गोलंदाज असणारे मदन लाल यांनी उधारीवर शॅम्पेनने आणून कशी मजामस्ती केली याबद्दलचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. चला तर त्याच मजेदार घटनेबाबत चर्चा करूया.
मदन लाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतर कपिल वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी गेला होता. त्या खोलीत स्मशान शांतता पसरली होती. अशा त्या वातावरणात कपिलने खिलाडूवृत्तीने विंडिजच्या खेळाडूंना हस्तांदोलन केले. त्यांनीही मोठ्या मनाने भारतीय संघाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी कपिलला विंडिज खेळाडूंच्या त्या ड्रेसिंग रूममध्ये शॅम्पेनच्या बाटल्या दिसल्या. भारताला १८३ धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडिजने आपला विजय निश्चित मानून भरपूर शॅम्पेनची ऑर्डर दिली होती. त्याच ह्या बाटल्या होत्या. पण पराभवाच्या दु:खात असल्याने त्या शॅम्पेनच्या बाटल्यांकडे विंडिजच्या खेळाडूंनी ढुंकूनही पाहिले नाही. अशातच कपिल देवने लॉईडला विचारले, ‘मी शॅम्पेनच्या काही बाटल्या घेऊ शकतो का? आम्ही एकही ऑर्डर केलेली नाही. क्लाईव्हने फक्त कपिलला इशारा केला आणि जाऊन एका कोपऱ्यात बसला. कपिल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी बाटल्या उचलल्या आणि टीम इंडियाने रात्रभर जल्लोष केला. मात्र, सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेल्या भारतीय खेळाडूंना त्या रात्री जेवण मिळाले नाही. खरे तर रात्री ९ वाजता स्वयंपाकघर बंद व्हायचे. सेलिब्रेशन करून भारतीय संघ हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा जेवण संपले होते. त्यानंतर टीमला उपाशी झोपावे लागले.’
त्या रात्रीनंतर भारतीय क्रिकेटचा सूर्य उगवला. भारतीय संघाला केवळ प्रायोजक मिळू लागले नाहीत, तर जागतिक क्रिकेटनेही टीम इंडियाची ताकद ओळखली. हॉकीच्या या देशातील तरुणाई क्रिकेटकडे आकर्षित होऊ लागली आणि आज टीम इंडिया जागतिक क्रिकेटची महासत्ता बनली आहे.