अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मागास प्रवर्गातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम स्थगिती दिली असून मागास प्रवर्गातील रिक्त जागा सर्वसाधारण करुन ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.,पं.स. ग्रा.प. निवडणुक विभागाचे संजय खडसे यांनी दिली.
जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील 10, मुर्तिजापूर येथील आठ, अकोला येथील एक, बाळापूर येथील तीन, बार्शीटाकळी येथील चार व पातूर येथील एक असे एकूण 27 ग्रामपंचायतीत निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे.
कार्यक्रमानुसार आचारसंहितेचा कालावधी हा मतमोजणीच्या सुधारित दिनांकापर्यंत लागू राहिल. निवडणुकीची नोटीस सोमवार दि. 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. 28 डिसेंबर रोजी पासुन सुरु होणार असून सोमवार दि. 3 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारांना सार्वत्रिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे छाननी मंगळवार दि. 4 जानेवारी रोजी तर नामनिर्देशपत्रे मागे घेणे गुरुवार दि. 6 जानेवारी आहे. तसेच निवडणुक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी दुपारी तीन नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान मंगळवार दि. 18 जानेवारी रोजी सकाळी साडेसात पासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तर मतमोजणी बुधवार दि. 19 जानेवारी रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुक निकालाची अधिसुचना सोमवार दि. 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल, असे आदेशाव्दारे कळविले आहे.