अकोला, दि.१४: अकोला-बुलडाणा-वाशिम विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीची आज मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात भारतीय जनता पार्टीचे वसंत खंडेलवाल विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घोषित केले. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली.
आज सकाळी आठ वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील धान्य गोडाऊन मध्ये मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक असलेले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे हे ही उपस्थित होते. मतमोजणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे पार पाडण्यात आली. मतमोजणीसाठी पाच टेबलची रचना करण्यात आली होती. त्यावर मतमोजणी करण्यात आली.
अंतिमतः मिळालेल्या मतांचा तपशिल या प्रमाणे- गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया यांना ३३४ मते , वसंत मदनलाल खंडेलवाल यांना ४४३ मते, एकूण वैध मते ७७७, अवैध मतांची संख्या ३१.
मतमोजणी नंतर निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर वसंत मदनलाल खंडेलवाल हे विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली. त्यानंतर वसंत खंडेलवाल यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत पार पडली. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अकोला संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम शैलेश हिंगे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार, अकोट श्रीकांत देशपांडे तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.