तब्बल २१ वर्षानंतर भारताच्या हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. याआधी २००० मध्ये लारा दत्ताने हा किताब मिळवला होता. आता २०२१ मध्ये भारताच्या हरनाज संधूने हा किताब पटकावला आहे. संधू ही मुळची पंजाब असून तिने टाॅप टेनमध्ये स्थान मिळवले होते. २१ वर्षीय हरनाज संधूने मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
याआधीच्या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भारतातील अनेक सौंदर्यवतींनी देशाची मान उंचावली आहे. सुष्मिता सेन हिने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर सेलिना जेटली, नेहा धुपिया यांनीदेखील आंतरराष्ट्रीय मंचावर सौंदर्याच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी २१ वर्षीय हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिने ही स्पर्धा जिंकली आहे.
हरनाझ संधूचा जन्म चंदीगडमधील शीख कुटुंबात झाला. तिला फिटनेस आणि योगाची आवड आहे. २०१७ मध्ये हरनाजने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. तिला २०१८ मध्ये मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. हरनाजने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला.
हरनाजने मिस इंडिया पंजाबचा किताब जिंकल्यानंतर द लँडर्स म्युझिक व्हिडिओ ‘तरथल्ली’ मध्ये काम केले होते. यंदा सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा किताब पटकावला. अभिनेत्री क्रिती सेननने हरनाजच्या डोक्यावर हा मुकुट सजवला होता.