अकोला, दि.९: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि.१० रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी नियुक्त मतदान कर्मचारी पथकांना मतदान केंद्रनिहाय साहित्याचे वाटप आज करण्यात आले व ही पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले. दरम्यान या पथकांनी सुनियोजितपद्धतीने आपले नेमून दिलेले कामकाज करावे व मतदान प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी,असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक तसेच निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिले.
आज सकाळी नऊ वाजेपासून नियोजन भवनातून मतदान साहित्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, डॉ. निलेश अपार, बाबासाहेब गाडवे तसेच सर्व मतदान कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र निहाय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना मतदान प्रक्रियेची उजळणी करुन सांगण्यात आली. त्यानंतर निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना किरकोळ दुर्लक्षामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य चुकांबाबत सांगितले. निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना आत्मविश्वास असावा, प्रत्येक प्रक्रिया ही काटेकोरपणे राबवावी. सर्व टप्पे बिनचुक पार पाडावे. साहित्याची, दिलेल्या मतपत्रिकांची आकडेवारीचा ताळमेळ जुळला पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक कर्मचाऱ्याने खबरदारी घ्यावी,असेही त्यांनी सांगितले.