शनिवारी(दि.11) राष्ट्रीय लोक अदालत
अकोला दि.9 ज्या पक्षकारांचे प्रलंबित प्रकरणे किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत अशा प्रकरणाचे जलद निपटारा होण्याकरीता ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये शनिवार दिनांक 11 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतमध्ये अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच दरम्यान होणार आहे. या लोक अदालतचे लाभ सर्व पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष य.गौ. खोब्रागडे व सचिव स्वरुप बोस यांनी केले.
लोक अदालतचे फायदे
लोक न्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जावून निकाला झटपट लागतो. लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजूतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा यांची बचत होते व लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते.
ज्या पक्षकारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 0724-2410145 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.