पेट्रोल- डिझेल किंमती मुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना दरकपातीमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या जागतिक बाजारेपठेत कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने इंधन दर आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. ओमायक्रॉनमुळे जागतिक बाजारपेठेवर मोठे परिणाम झाले आहेत. त्याचा परिणाम कच्च्या तेलावरही झाला आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत ८४ डॉलर प्रतिबॅरल एवढी होती. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कच्चे तेल अवघे ४३ डॉलर प्रतिबॅरल होते. ते काही दिवसांत ७० डॉलर प्रतिबॅलर झाले. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वृत्तानंतर जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. सध्याच्या लशी ओमायक्रॉनवर पुरेशा परिणामकारक ठरणार नसल्याची चर्चा असल्याने त्याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर जाणवत आहे.
अमेरिकेसह भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी तेलाचे राखीव साठे खुले करण्याचे धोरण अवलंबले आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक देश त्रस्त आहेत. मात्र, आता ओमायक्रॉनच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमुळे इंधनाच्या दरात चढउतार होत असतो. आताही तेल उत्पादक कंपन्या इंधनाच्या किमती कमी करणार की आहे ते दर ठेवणार याकडे लक्ष लागले आहे.
पेट्रोल- डिझेल किंमती : राखीव तेलसाठ्यातून तेलपुरवठा करण्याचा निर्णय
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिका, चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरियाने आपल्या धोरणात्मक राखीव तेलसाठ्यातून तेलपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अनेक देश असा साठा करून ठेवतात. भारत आपल्या अशा साठ्यामधून प्रथमच तेल बाहेर काढणार आहे. आपल्या देशात अशा प्रकारचा साठा तयार करण्याविषयीची चर्चा 2005 मध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती आणि त्यावर तत्त्वतः एकमत झाले होते. ऊर्जा हा राष्ट्रीय सुरक्षेशीही संलग्न विषय आहे, हा त्यामागील विचार होता.
या साठ्याचा उद्देश भविष्यातील संभाव्य युद्धप्रसंगी किंवा टंचाईकाळात आपल्या तत्कालीन गरजा पूर्ण करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या संकल्पनेची व्यावहारिक अंमलबजावणी सुरू झाली आणि सद्यःस्थितीत भारतात असे तीन आपत्कालीन तेलसाठे आहेत. या साठ्यांमध्ये सध्या सुमारे 5.33 दशलक्ष टन म्हणजे सुमारे 38 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आहे. यापैकी पाच दशलक्ष बॅरल कच्चे तेल बाजारात आणण्याची चर्चा सुरू आहे.