नवी दिल्ली: राज्यसभेतील ज्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं, त्यामध्ये शिवसेना, काॅंग्रेस, तृणमूल काॅंग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनिल देसाई यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. त्यावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “गुन्हेगारांनी त्यांची स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळते. पण, आम्हाला तीदेखील मिळाली नाही”.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांंच्याकडे राजीनामा पाठविला आहे. चतुर्वेदी या सांसद टीव्हीच्या निवेदक असून, त्यांनी निवेदक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्यामध्ये म्हटलं आहे की, “मेरी कहानी या कार्यक्रमाच्या निवेदक पदाचा मी राजीनामा देत आहे. कारण, खासदार म्हणून मी माझ्या कामाबद्दल जितकी कटिबद्ध आहे तितकीच मी कार्यक्रमातील जबाबदाऱ्यांबद्दल कटिबद्ध आहे. त्यामुळे मी निवेदकपदापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे”, असं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राजीनामा पत्रात म्हंटलेलं आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यसभेत गोंधळ घातला, असा ठपका ठेवून १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. ही कारवाई झाल्यामुळे राज्यसभेत या खासदारांना आपले प्रश्नं मांडता येणार नाहीत की, सहभागी होता येणार नाही. या खासदारांमध्ये सीपीआय, सीपीएम, तृणमूल काॅंग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे.
काय झालं होतं पावसाळी अधिवेशनात?
११ ऑगस्ट महिन्यांत राज्यसभेत विमा विधेयकात चर्चा सुरू होती. त्यावेळी प्रचंड गोंधळ सुरू झाला, ते प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलण्यात आले. त्यानंतर राज्यसभा सभापती व्यंकया नायडू यांनी सभागृहात कामकाज स्थगित केले होतं.