अकोला, दि.४: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी आता संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार असून, शेतकऱ्यांना हे अर्ज भरणे अधिक सुविधाजनक व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभागाने संकेतस्थळ तसेच ॲण्ड्रॉईल मोबाईल अप्लिकेशनही तयार केले आहे.
यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अकोला डॉ. गजानन दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी बांधवांना शेतीपूरक तसेच स्वयंरोजगारासाठी पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांमधील लाभार्थी निवडीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवडणे ही पद्धती सुरु झाली आहे. आता जिल्हास्तरीय योजनांसाठीही हीच पद्धती अवलंबिण्यात येणार आहे. या संगणक प्रणालीत एखाद्या व्यक्तीने योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्यानंतर त्याला दरवर्षी अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील पाच वर्षे लागू ठेवण्याची सुविधा ठेवण्यात आली आहे. शिवाय प्रतिक्षायादीतील क्रमांकानुसार अंदाजे लाभ कधी मिळेल हे ही कळू शकणार आहे. त्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा अन्य पूर्ततांसाठीचे नियोजन वेळेत करणे शक्य होणार आहे.
यानुसार, आता नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ म्हशी गाईंचे गट वाटप, शेळी मेंढी गट वाटप, मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, कुक्कुट पिलांचे वाटप इ. बाबत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com संकेतस्थळ आहे. तसेच AH-MAHABMS हे मोबाईल ॲप्लिकेशन असून हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी शनिवार दि.४ ते शनिवार दि.१८ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरण्यात अडचण आल्यास वा योजनेची अधिक माहिती हवी असल्यास टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ वर संपर्क करावा. पशुपालकांनी अर्ज भरतांना स्वतःच्या मोबाईलचा अधिकाधिक वापर करावा व मोबाईल क्रमांक बदलवू नये.
अधिक माहितीसाठी तालुका पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजिकच्या पशु वैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अकोला डॉ. गजानन दळवी यांनी केले आहे.