अकोला,दि.४: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार दि.१० रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक कर्मचाऱ्यांचे आज मतदान व मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्यांबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. आजचे हे प्रशिक्षणाचे दुसरे सत्र होते.
आजच्या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मतदार संघातील सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य अधिकारी व प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अकोला संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा दिनेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रावरील रचना, नियुक्त केलेल्या प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये, सुक्ष्म निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, मतपेट्यांची हाताळणी या व अन्य आवश्यक बाबींबाबत माहिती देण्यात आली. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, याबाबत सुचना देण्यात आल्या.