नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षभरात एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट्स व्यवहार वाढले आहेत. हे पहिल्यांदाच असे घडले असून नागरिकांकडून आता कॅशलेस पेमेंटवर भर दिला जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इनफिनिटी फोरममध्ये (InFinity Forum) बोलताना त्यांनी डिजिटल इंडिया उपक्रमाविषयी माहिती दिली.
सध्या बँकांचे व्यवहार पूर्णपणे डिजिटल स्वरुपात झाले आहेत. एका दशकापेक्षा कमी कालावधीत डिजिटल पेमेंट व्यवहार सामान्य होऊ शकतात, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
एका अहवालानुसार, देशात डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग, गुगप पे, फोन पे, युपीआय याद्वारे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. युपीआयची सुरुवातही २०१६ मध्ये झाली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुमारे ७.७१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटबंदी निर्णयाची घोषणा करुन पाच वर्ष पूर्ण झाली. ८ नोव्हेबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता मोदींनी याची घोषणा केली होती. त्याचवेळी पासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर डिजिटल पेमेंट व्यवहारात वेगाने वाढ झाली.