अकोला,दि.2 : आस्थापनावर बाल व किशोरवयीन कामगार ठेवणे हा गुन्हा आहे. बालकामगार ठेवण्याऱ्या आस्थानावर कार्यवाही करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलामार्फत रतनलाल प्लॉट येथील पॅलेस वाईन बारवर धाड टाकून कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी दिली.
सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कृती दलाने धाड सत्राचे नियोजन करुन मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये पॅलेस वाईन बार, रतनलाल प्लॉट रोड या आस्थापनेवर एक बाल कामगार काम करीत असल्याचे निदर्शनास आले. या बाल कामगारास त्वरीत मुक्त करण्यात येऊन संबंधीत आस्थापना मालकाविरुध्द सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन येथे बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अन्य दोन आस्थापनावरही कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे, दुकान निरीक्षक विनोद जोशी, शिक्षण विभागाचे श्याम कुलट, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे योगेन्द्र खंडारे, सुदन खंडारे, चाईल्ड लाईन व पोलिस कॉन्स्टेबल फिरोज बेनिवाले यांचा समावेश होता. जिल्ह्यातील आस्थापनाधारकांनी आपल्या आस्थापनेवर बालकामगार कामावर ठेऊ नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले.