अकोला, दि.२३: संविधान दिनानिमित्त शुक्रवार दि.२६ रोजी जिल्हा प्रशासनामार्फत ७५ हजार संविधान उद्देशिकांच्या प्रतिंचे वितरण करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता संविधान उद्देशिकेचे वाचन होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. मुख्य समारंभ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्ह्यातील महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख, सामाजिक न्याय विभाग, महिला बालविकास विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे संविधान उद्देशिकेच्या ७५ हजार प्रति वितरीत करण्यात येणार आहेत. या प्रति शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सर्व शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वितरीत करण्यात येतील. यानिमित्ताने सर्व शाळा महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन होईल. जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सकाळी ११ वाजता होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे संयोजन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनीकेले आहे. याकार्यक्रमास उपस्थितीचे तसेच जिल्ह्याभरातील सर्व कार्यक्रमांमधील सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.