अकोला, दि.22: अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जारी करण्यात आले असून दि.२३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत (रात्री नऊ वा. ते सकाळी सहा वा. पर्यंत) संचार बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.
यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार, दि.२३ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दि. २३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य. वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.