आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आलाय. (Andhra Pradesh Floods) मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झालाय. तर १०० लोक बेपत्ता झाले आहेत. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. (Andhra Pradesh Floods)
शुक्रवारी तीन जिल्ह्यांतील आणि एका दक्षिणेकडील किनारी जिल्ह्यामध्ये २० सेंटीमीटरपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खूप नुकसान झाले. कडप्पा जिल्ह्यात आतापर्यंत १२ लोक बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. वायुदल, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून पुरात अडकलेल्या लोकांना वाचवलं जात आहे.
चेयुरु नदी ओवरफ्लो झाल्याने अन्नामय्या सिंचाई परियोजनेचे पाणी राजमपेट विधानसभा क्षेत्र आणि कडप्पा जिल्ह्यातील अनेक भागात शिरले. आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्टची एक बस रामपूरममध्ये अडकली. अनेक लोकांना वाचवण्यात आले. परंतु, १२ लोकांचा मृत्यू देखील झाला. सात मृतदेह गंडलुरुदवळ, तीन रायवरम जवळ आणि दोन मंडपल्ली जवळ सापडले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. राज्याला सर्व मदत पोहोचवण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, मुख्यमंत्री शनिवारी पूरग्रस्त भागांचे हवाई पाहणी करतील. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा शुक्रवारी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला पार करून गेला, अशी माहिती हवामान विभागाने दिलीय.