अकोला,दि.९: जिल्ह्यात कोविड लसीकरण १०० टक्के करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून बुधवार दि.१० ते शनिवार दि.२० या दहा दिवसांच्या कालावधीत लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज यंत्रणेस दिले.
जिल्ह्यातील कोविड लसीकरणासंदर्भात सद्यस्थितीचा आढावा व आगामी कालावधीत १०० टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे यांच्यासह सर्व तालुका शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, आशा समन्वयक आदी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरणासाठी पात्र व्यक्तिंपैकी ५५ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर २५ टक्के लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. बुधवार दि.१० पासून ते दि.२० पर्यंत लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार आहे. त्यासाठी पहिला डोस घेतलेल्या लोकांची यादी आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच अन्य गावस्तरीय कर्मचाऱ्यांपर्यंत देण्यात आल्या आहेत. त्यांनी या लोकांना प्रत्यक्ष भेटून दुसरा डोस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच जिल्हास्तरीय यंत्रणेकडून पहिला डोस घेतलेल्या लोकांना फोन कॉल करुन दुसरा डोस घेण्याबाबत स्मरण करुन देणे, तसेच लसीकरण उपलब्ध असलेल्या जवळच्या केंद्राची माहिती दिली जाईल. या प्रक्रियेचे संनियंत्रण हे गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच तहसिलदार यांच्या पातळीवर केले जाईल. तसेच ज्या ठिकाणी लोकांची मागणी असेल त्या ठिकाणी व त्यांच्यादृष्टीने सोईच्या वेळेस लसीकरण सत्र आयोजित करण्याबाबतही जिल्हाधिकारी अरोरा यांनी निर्देश दिले.
त्यासोबतच समाजातील विविध घटकांना, तसेच स्वयंसेवी संस्था, विविध धर्मांचे धर्मगुरु यांच्या मदतीने लोकांना लसीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी अरोरा यांनी निर्देश दिले.