अकोला:दि.8: मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नोंदणीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार अकोला पूर्व मतदार क्षेत्रात शनिवार, रविवार दि. 13, 14 व 27, 28 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पूर्व विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांनी केले
अकोला पूर्व मतदार क्षेत्रात दि. 1 ते 30 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी प्रसिद्ध केल्याप्रमाणे अकोला पूर्व विधानसभा मतदार संघातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले 16 हजार 207 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रावरील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे उपलब्ध असलेल्या प्रारुप मतदार यादी मध्ये त्यांचे नाव समाविष्ट असल्याची खात्री करावी. ज्या मतदारांचे नाव यादी मधून वगळले गेले असल्यास त्यांनी नवीन अर्ज भरून मतदान नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीत छायाचित्रे नसल्यामुळे वगळलेल्या मतदारांची यादी यापूर्वी राजकीय पक्षांना पुरवण्यात आलेली असून सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्याबाबत सहकार्य करावे. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर मतदार नोंदणी करता येणार नाही. तरी मतदार नोंदणी मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.