अकोला,दि.३: बार्शीटाकळी तालुक्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत १६७ खातेदांराचे आधारप्रमाणीकरण प्रलंबित आहे. या खातेधारकांनी सोमवार दि. १५ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिमेव्दारे आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन बाळापूरचे सहायक निबंधक सहकारी संस्था रोहिणी विटणकर यांनी केले आहे.
शासनाव्दारे दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ सुरु केली आहे. या योजनेचा बार्शीटाकळी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत १४०१२ कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून त्यापैकी १३०९५ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रमांक पोर्टल प्राप्त झाला आहे. त्यापैकी १२९४० खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील १२७७३ खात्यावरील रु. ७८.६८ कोटीची कर्ज मुक्तीची रक्कम संबधित खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे. संबधीत बँका व सहकार विभागामार्फत सर्व पात्र खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आज रोजी तालुक्यातील १६७ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे शिल्लक आहे. प्रलंबित आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सोमवार दि. १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या खातेदारांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतांनाही अद्यापपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकरी बांधवानी आधार प्रमाणीकरणाची शेवटची संधी असून लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीचा नंतर विचार केला जाणार नाही. लाभार्थ्यांना काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बार्शिटाकळी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.